आदि शंकराचार्य रचित ‘मनीषा पंचकम्‘ हे अद्वैत वेदान्तातील एक अत्यंत प्रेरणादायी स्तोत्र आहे. हे केवळ पाच श्लोकांचे असून त्यात भेदभाव संपवून ‘प्रत्येक जीव ब्रह्म आहे’ हा महान संदेश दिला आहे.
ह्या स्तोत्राची पार्श्वभूमी म्हणजे एक छोटीशी कथा आहे. एकदा १५, १६ वर्षांचे आचार्य शंकर वाराणसीत गंगेच्या तीरावर आपल्या शिष्यांसह जात होते. तेव्हा त्यांच्या समोरून चार कुत्र्यांसह एक चांडाळ (ज्याला समाजात त्यावेळी खालच्या दर्जाचे मानले जात असे) जात होता. आचार्यांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले. त्यावर त्याने पृच्छा केली, “तुम्ही नक्की कोणाला बाजूला व्हायला सांगत आहात? माझ्या शरीराला की माझ्या आत्म्याला? जर आत्म्याला सांगत असाल, तर तो चैतन्यमय आत्मा सर्वत्रच आहे आणि शरीराचे सांगत असाल, तर सर्व शरीरे आणि पदार्थ पंचमहाभूतांनीच बनलेले आहेत.” हे ऐकताच आचार्यांना जाणवले की साक्षात शिवशंभोच त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. तेव्हा त्यांनी जे पाच श्लोकांमध्ये उत्तर दिले, तेच ‘मनीषा पंचकम्’.
पहिल्या चार श्लोकांमध्ये आचार्यांनी प्रत्येक वेदामधल्या प्रसिद्ध अशा एकेका महावाक्याचा अर्थ गुंफलेला आहे आणि शेवटच्या पाचव्या कडव्यामध्ये ज्ञानी व्यक्तीच्या अनुभवाचे निवेदन आहे. प्रज्ञानं ब्रह्म (ऋग्वेद – ऐतरेय उपनिषद), अहं ब्रह्मास्मि (शुक्ल यजुर्वेद – बृहदारण्यक उपनिषद), तत् त्वम् असि (साम वेद – छांदोग्य उपनिषद) आणि अयम् आत्मा ब्रह्म (अथर्वण वेद – मांडुक्य उपनिषद) ही ती महावाक्ये होत.
या स्तोत्रातील प्रमुख भाव असे की:
१. भेदभाव हा केवळ भ्रम आहे: आपण ज्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजतो, ते निव्वळ बाह्य रूप आहे. ज्याप्रमाणे आरशात दिसणारे प्रतिबिंब वेगळे दिसले तरी मूळ वस्तू एकच असते, तसाच परमात्मा सर्वांमध्ये सारखाच आहे.
२.आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ होय: जी व्यक्ती हे जाणते की “मी शरीर नसून शुद्ध चैतन्य आहे”, तीच खरी ज्ञानी. मग ती उच्च कुळातील असो वा सामान्य, तीच माझी गुरू, असे आचार्य म्हणतात.
३. साक्षी भाव: आपली बुद्धी, मन आणि इंद्रिये ज्याच्या प्रकाशामुळे कार्य करतात, तो ‘साक्षी’ आत्मा सर्वत्र व्यापून आहे.
४. ब्रह्मानंद: ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा समुद्रापेक्षा वेगळ्या नसतात, तसे आपण सर्व त्या ईश्वरी आनंदाचा भाग आहोत. हे ज्ञान ज्याला झाले तो मुक्त झाला.
आपण ह्याचा अभ्यास, वाचन का करायचे?
अहंकार नष्ट होतो: हे स्तोत्र वाचल्याने आपण कितीही शिकलेले असलो, तरी आपल्यातील ‘मी’पणा कमी होऊन नम्रता येते.
सम दृष्टी: आजच्या काळात जेव्हा आपण जातपात, श्रीमंत-गरीब, उच्चनीच अशा विविध भेदात गुंतलो आहोत, तेव्हा हे स्तोत्र आपल्याला खऱ्या मानवतेची आणि समानतेची शिकवण देते.
मानसिक शांती: “मी फक्त हे नश्वर शरीर नसून अनंत शक्तीचा स्रोत आहे” हा विचारच मनातील भीती आणि ताण कमी करण्यासाठी पुरेसा आहे.
बुद्धीची स्पष्टता: ‘मनीषा’ म्हणजे ‘निश्चय’ किंवा ‘बुद्धी’. हे स्तोत्र वैचारिक स्पष्टता वाढवायला मदत करते.
मनीषा पंचकम् हे एक वेदान्त स्तोत्र आहे. जर तुम्हाला स्वतःला ओळखायचे असेल आणि जगाकडे बघण्याचा एक सकारात्मक, दिव्य दृष्टिकोन हवा असेल, तर या पाच श्लोकांचा सखोल अभ्यास नक्की करा.
आचार्यांच्याच शब्दात सांगायचे तर “एषा मनीषा मम – असे माझे ठाम मत आहे.”
स्तोत्राचे पुस्तक Chinmaya International Foundation (CIF) च्या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहेच.
– Uma Patki















